अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या भयावह संकटात शहरातील एका औषध विक्रेत्याने गंभीर कोरोना रुग्णाच्या मुलीला रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल प्रत्येकी २२ हजार रुपयांना विकल्याची खात्रीशीर तक्रार आलेली आहे.
यामुळे रुग्णांची लूट करणाऱ्यांना वेळ प्रसंगी नगराध्यक्ष पद बाजूला ठेवून चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी रविवारी (ता.१८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
सध्या कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज रुग्णसंख्या व बळी नवनवे विक्रम रचत आहे. अशा भयावह परिस्थितीत शासकीय यंत्रणा रात्रं-दिवस इमाने इतबारे कर्तव्य निभावत आहे.
त्याचप्रमाणे खासगी हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशनही काम करत आहे. कोपरगावातील अनेक औषध विक्रेते स्वतः प्रचंड गुंतवणूक करून कोरोनाबाधितांना प्रामाणिकपणे औषधे, इंजेक्शने उपलब्ध करून देत आहेत.
रात्री-अपरात्रीही सेवा देत आहेत. परंतु दुर्दैवाने एका औषध विक्रेत्याने गंभीर कोरोना रुग्णाच्या मुलीला 3 रेमडेसेवीर इंजेक्शने तब्बल प्रत्येकी २२ हजार रुपये घेऊन दिल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे भांबावून गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अशी प्रचंड लुट थांबली पाहिजे. यानंतर अशी लुटमारीची तक्रार आली तर संबंधिताला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आज कुणीही गरजू पोलिसांकडे, शासनाकडे तक्रार देत नाही.
कारण पुन्हा औषधांची गरज पडू शकते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मेडिकल स्टोअर असोसिएशनचा यात काहीच दोष नाही. पण अपवाद असतातच. त्यामुळे गरजूंची लुट थांबविण्यासाठी प्रसंगी नगराध्यक्षपद बाजूला ठेवून
काळाबाजार करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला जाईल हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. वाईटपणा नको म्हणून कुणी बोलत नाही याचा गैरफायदा कुणीही घेऊ नये. असंतोषाचा भडका उडू शकतो याचे भान ठेवा.
सध्या तरी ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचे नियंत्रण-वितरण ग्रामीण रुग्णालयाच्या निगराणीखाली झाले तर काळाबाजार रोखला जाऊ शकतो आणि नागरिकांनी देखील शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे,
खाजगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व डॉक्टरांनी एकमेकांना सहकार्य करूनच कोरोनाला तोंड द्यावे, असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.