दूध डेअरीचालकाचे भरदिवसा दोन लाख लांबवले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- दुध उत्पादकांचे दुधाचे पेमेंट देण्यासाठी डेअरीचालकाने बँकेतून काढलेली दोन लाखाची रक्कम स्कार्पिओ गाडीत बॅगेत ठेवली. मात्र स्कार्पिओला धडक देऊन व हुज्जत घालत दोन लाख रूपयांची रोख रक्कम असलेली ही बॅग अज्ञात भामट्याने लांबविली आहे.

ही घटना नगर-मनमाड रस्त्यावरील आज दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या आरोपींच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी रात्री कुंडलिक देवकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवकर यांची दूध डेअरी असून आज दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी दुपारी एकच्या सुमाराला नगर-मनमाड रस्त्यावरील ॲक्सिस बँकेतून दोन लाख १५ हजार रूपये रोख रक्कम काढली.त्यांनी ही रक्कम एका पिशवीत ठेवली प ती पिशवी चारचाकीच्या पुढील सिटवर ठेवून ते स्वत: गाडीचालवत निघाले मात्र ते या रोडवरील एस.जी कायगावकर सराफ दुकानाजवळ आले असता

पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघेानी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावून तुम्ही आमच्या एकाला धडक दिली असून, पळुन जात होता काय अशी विचारणा करून हुज्जत घालण्यास सुरूवात केली. यावेळी देवकर कारमधून खाली उतरले असता, कारची दुसऱ्या बाजूची दरवाजाची काच उघडी राहीली.नेमकी त्याच बाजूला पैशाची पिशवी ठेवली होती. या संधीचा फायदा घेत अन्य दोन इसम गाडीजवळ आले. त्यांनी काय झाले, अशी विचारणा केली.

तसेच नजर चुकवून त्यांनी गाडीतील बॅग काढून घेऊन मनमाड रस्त्याने पोबारा केला. त्यानंतर हुज्जत घालणाऱ्या त्या दोन इसमांनीही तेथून पलायन केले. यावेळी देवकर हे परत कारमध्ये बसले असता त्यांना सीटवर ठेवलेली बॅग कोणीतरी पळवल्याचे लक्ष्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

तसेच आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा चोरीचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. या घटनेत चार आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान रात्री उशीरा देवकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office