अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रंगकर्मींसाठी रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली.
राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मीशी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या कलाक्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहे.
या सर्व रंगकर्मीसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार असून हे मंडळ लवकर स्थापन होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हास्तरावर करण्यात येत असले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल याबाबत प्रयत्न करावेत.
जाणून घ्या रंगकर्मींच्या मागण्या रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्या करीत असलेले पत्रक देशमुख यांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील रंगकर्मीची नोंद होणे,
कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींमध्ये शिथिलता आणणे, असंघटित रंगकर्मीसाठी रंगकर्मी बोर्ड स्थापन करणे, वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी,
एकपात्री किंवा दोनपात्री कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी, अटी व नियमांचे पालन करुन रंगकर्मींना कला सादर करण्याची परवानगी अशा काही मागण्या यावेळी रंगकर्मीनी देशमुख यांना केल्या