जिल्ह्यात राबविले जाणार ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अभियान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आता ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंबंधी राज्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधी सूचना केल्या.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. बेडची संख्या वाढविण्यात आली होती, मात्र ऑक्सिजनची उपलब्धता कमी पडली होती. त्यामुळे आता सरकारने त्यावर भर देण्याचे ठरविले आहे.

यामध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तीन दिवसांचा साठा करण्यावर भर देण्यात येणार असून सर्व जिल्ह्यांना आपला कृती कार्यक्रम आखण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आल्याची

माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. ज्या त्या जिल्ह्यांत आणि शहरांत ही सोय करण्यात येणार आहे.

यातही वैद्यकीय वापराच्या लिक्विड ऑक्सिजनवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन उत्पादन करण्यासोबतच जास्तीत जास्त भर साठवणुकीवर देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १७ प्लॅंट उभारण्याचे नियोजन : नगर जिल्ह्यात १७ प्लॅंट उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील सहा ठिकाणी काम सुरू झाले आहे. ११ ठिकाणी पुढील आठवड्यात यंत्रणा येणार आहे.

जिल्ह्याला २३० टन ऑक्सिजनची गरज : ‘नगर जिल्ह्याला २३० टन ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन नियोजन केले आहे. यामध्ये ७० टक्के लिक्विड, २० टक्के गॅस आणि १० टक्के रुग्णालयांत उभारण्यात आलेल्या प्लँटमधून ऑक्सिजन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24