अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- व्याजाने घेतलेल्या साडेपाच लाखाचे व्याजासह दहा लाख दे… जर पैसे द्यायचे नसतील तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे…
नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.. अशी धमकी देऊन व्याजाच्या पैशात बळजबरीने ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना कर्जतमध्ये घडली.
याप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील दळवी वस्ती येथील एकाने फिर्याद दिली की, महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके व इतर दोघांनी मला व माझ्या भावाच्या घरात घुसून माझ्या नातेवाईक यांना घरात घेत
व्याजाने घेतलेले पाच लाख पन्नास हजार व त्यावरील व्याजासह एकूण दहा लाख रुपये द्या, असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली.
तसेच फिर्यादीचा ट्रॅक्टर बळजबरीने ओढून नेला. आमचे १० लाख रुपये द्या, तेव्हाच ट्रॅक्टर घेवून जा. जर तुम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुमची जमीन माझे नावावर करुन दे, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.
अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके यास अटक करुन त्यच्याकडून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या आवाहनानंतर सावकारकीच्या तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली असल्याने तालुक्यात चोरून अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारकी क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.