अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाच्या खुनप्रकरणी आरोपी प्रशांत बबन शेळके (रा. खेर्डे ता. पाथर्डी) याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी नामंजूर केला आहे.
खर्डे येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या वादातून राजेंद्र रामकिसन जेधे यांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. राजेंद्र हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, अहमदनगर येथे आणले होते. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.
या प्रकरणी शेषराव दत्तू जेधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाथर्डी पोलिसांनी दोन आरोपींचा खुनाच्या गुन्ह्यात समावेश नसल्याचा अहवाल न्यायालयास सादर केला.
त्यानुसार त्यांना या गुन्ह्यात वगळण्यात आले होते. प्रशांत याने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. दोघांना गुन्ह्यात वगळण्यात आलेले आहे.
त्यामुळे प्रथमदर्शनी ही खोटा गुन्हा आहे, असा बचाव करण्यात आला. फिर्यादीतर्फे अंकिता सुद्रिक आणि सरकारतर्फे के. व्ही. राठोड यांनी बाजू मांडली.
राजेंद्र यांचा मृत्यू हा चाकू खुपसल्यामुळे झाला आहे, याबाबतचा वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहे. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळला आहे.