साई संस्थान अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून ‘हे’ नाव चर्चेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- सध्या शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे, यात काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर असताना राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याचे समजते.

वाबळे हे माजी खा बापूसाहेब तनपुरे यांचे विश्वासू आहेत. तसेच, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. तनपुरे घराण्याचे हितचिंतक असलेले वाबळे यांचे राष्ट्रवादी पक्षासाठी देखील मोठे योगदान आहे.

त्यांच्याकडे कोणते मोठे राजकीय पद नसले तरी पडद्याआड किंगमेकर म्हणूनच ते काम करत असतात. त्यामुळेच पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील या प्रमुख नेत्यांसमवेत वाबळे यांची खास ओळख आहे.

म्हणूनच, या सर्व नेत्यांनी वाबळे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना साई संस्थांनचे विश्वस्त पदी संधी दिली होती. दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6 आमदार आहेत, याशिवाय अन्य काही कारणांमुळे साई संस्थानवर आम्ही दावा केला आहे.त्यासाठी वरिष्ठ पातळीवर नेत्यांकडे तशी मागणी केलेली आहे.

कोणत्याही परिस्थितीत शिर्डी संस्थान हे राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, आणि नक्कीच यात यश मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला. लवकरच साई संस्थान विश्वस्त निवड होत आहे.

यात अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीकडून येथे अनेक विद्यमान आमदार इच्छुक असले तरी सत्तेचे विकेंद्रीकरण लक्षात घेता ही संधी त्यांना मिळणे अवघड आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावावर मुंबईत चर्चा झाल्याचेही समजले आहे

त्यामुळे साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून राहुरीला अर्थात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या मतदार संघात वाबळे यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे, अर्थात वाबळेंना संधी मिळाली तर ना. तनपुरे यांचे मतदार संघातील प्राबल्य वाढणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24