अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता अहमदनगर जिल्ह्यातयून आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील भाजप नेते प्रा. राम शिंदे यांचे नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते, मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांनाच हे पद मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी गेल्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव केला.
त्यानंतर शिंदे यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा समर्थकांना होती. अलीकडेच त्यांना पक्ष संघटनेत पहिल्यापेक्षा मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना हे पद मिळाले नव्हते. आता ओबीसी चेहरा देण्याची पक्षाची भूमिका असल्याने शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शिंदे यांची बलस्थानेही सांगितली जाऊ लागली आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे तब्बल चौदा खाती होती.
त्या सरकारमध्ये सर्वांत जास्त खाती मिळालेले ते एकमेव मंत्री होते. आता प्रदेशाध्यक्षच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने थेट या पदासाठीच त्यांच्या समर्थकांकडून दावा सांगितला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पूर्वी या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती.