अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- देशाच्या प्रगतीसाठी मुले शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. लहान मुलांना बालमजूरीपासून मुक्त करुन त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे
यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर तसेच सेव द चिल्ड्रन इंडीया, मुंबई, अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आभासी पध्दतीने आयोजन करण्यात आले होते.
बालगृह अहमदनगर, स्नेहालय संस्था अहमदनगर त्याचबरोबर समर्थ शाळेमधील विद्यार्थी हे आभासी पध्दतीने कार्यक्रमात उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सचिव रेवती देशपांडे बोलत होत्या.
आर्थिक परिस्थितीचे कारण देत लहान मुलांना बालमजुरीकडे ढकलले जाण्याचे प्रमाण दिसत आहे. या मुलांना खंबीरपणे उभे करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आवश्यक आहे.
देशाचे भविष्य असणारी ही मुले मजुरीच्या अंधारात ढकलले जात आहेत. आज देश खंबीपणे उभा राहण्यासाठी प्रत्येक बालक स्वत:च्या पायावर उभा असला पाहिजे, असे मत रेवती देशपांडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात ॲड. सुभाष काकडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकामगार कायदेबद्दल मार्गदर्शन केले. ॲड. सुभाष ब-हाटे यांनी आपत्तीग्रस्त पिडीतांना विधी सेवा प्राधिकरण मार्फत दिल्या जाणा-या कायदेविषयक सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
मंदार शिंदे, संयोजक, आर्क, बालहक्क कृती समिती, पुणे यांनी शिक्षणाबद्दल बालकांचे हक्क या बद्दल मार्गदर्शन केले. रमेश कदम, संस्थापक, रेशनिंग व जीविका हक्क संघटना, मुंबई यांनी बालकांचे अन्न सुरक्षा कायदे याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालसुरक्षा संस्था, अहमदनगरचे जिल्हा समन्वयक नामदेव येडगे यांनी केले तर आभार प्रविण कदम यांनी मानले. मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.