घुलेवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अखेरीस पायउतार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत ना ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत मतदानाने पायउतार केले.

राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता.

यादरम्यान सोमवारी (दि. १३) गावातील महात्मा फुले विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. थेट जनतेतून निवडून आलेल्या राऊत यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, ५ जुलै रोजी लोकनियुक्त सरपंच राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला होता.

त्यावेळी सरपंच व १७ सदस्य असे एकूण १८ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठराव नोटीसमध्ये नमूद मुद्यांवर सर्वांची मते जाणून घेतली आणि त्यानंतर सरपंच राऊत यांनी त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. १६ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर २ सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले होते.

तीन चतुर्थांशपेक्षा जास्त मते असल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आला होता. तहसीलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत अहवाल पाठवला होता.

सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आले असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशानुसार सोमवारी विशेष ग्रामसभेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.

तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महसूल असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या घुलेवाडीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. मात्र या गावातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने, राजकारण ढवळले आहे.