राज्यात डासांपासून होणाऱ्या आजाराचे रुग्ण वाढले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- २० ऑगस्ट १८९७ रोजी डॉ. रोनाल्ड रॉस यांनी कलकत्ता येथे हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला. हा शोध आपल्याच देशात लावल्याने या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संकल्पना ठरवून हा दिवस जागतिक डास दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. डासांमुळे राज्यात हिवतापाचे ७९०८, डेंगूचे २५५४ तर चिकनगुन्याचे ९२८ रुग्ण आढळले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी नागरिकांनी उपाय योजना करुन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाने केले आहे.

राज्यात डासांपासून होणाऱ्या आजाराचे रुग्ण वाढल्याने शासनाकडून उपाय योजना सुरू आहे. जगात डासांच्या जवळपास ३,५०० प्रजाती आहेत. अ‍ॅनाफेलिस डासापासून हिवतापाचा, क्युलेक्स डासापासून हत्तीरोग व मेंदुज्वर, एडीसपासून झिका, डेंग्यू, चिकनगुनिया तर मंसोनिया डासापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो.

या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सर्व पाणी साठे वाहते करावे. कोरडा दिवस पाळवा. वेंट पाईपला जाळ्या बसवा. संध्याकाळी घरात धूर करा. घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करु नका. ताप आल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी करा.

कोणताही ताप अंगावर काढू नका. या आजारासाठी सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी रुग्णालयात मोफत असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा,

असे आवाहन उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सहायक संजय जी. सावंत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, आरोग्य पर्यवेक्षक विनायक वाडेकर यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24