अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द मध्ये केशव गोविंद बनातील भगत वस्ती येथील शेतकरी रमेश भगत यांच्या विहिरीत काल 9 जून च्या रात्री शेळी पकडण्याच्या नादात शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली.
विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरामध्ये वेगाने पसरल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली. बिबट्या व शेळी पडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती दिली.परंतु बराचसा कालावधी उलटूनही वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत.
त्यानंतर घाबरलेल्या शेळीला स्थानिक नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढले. सदर घटनेची माहिती डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांना देण्यात आली.
अन् मग वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यु करुन बिबट्याला मध्यरात्री नंतर सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे.
या बिबट्याच्या आकारावरून ही गरोदर मादी असण्याची दाट शक्यता आहे.जवळपास पाच ते सहा तास हा बिबट्या विहिरीमध्ये पोहत होता.