महावितरणच्या कृपेने ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच बळीराजा अंधारात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यातच थकबाकीच्या वसुलीपोटी कृषी पंपांची वीज खंडित करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात कृषी पंपांची सुमारे पाच हजार कोटींची थकबाकी आहे.

त्यामुळे वसुली मोहीम सध्या महावितरणने चांगली सुरू केली असून, त्याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. तनपुरे हे नगर जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी ऊर्जा विभागाने काहीशी सूट दिलेली आहे.

परंतु, शेतकऱ्यांची पिके ऐन जोमात असताना वीज खंडित करण्याची मोहीम अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे एकूण १६० पैकी १२ रोहित्रे बंद केल्याने त्यावरील १३१७ शेती पंपांचा वीजपुरवठा बंद आहे.

नगर तालुक्यातील वाळकी, देऊळगाव सिद्धी, बाबुर्डी घुमट, खंडाळा, बाबुर्डी बेंद, राळेगण म्हसोबा हिवरे झरे, गुंडेगाव, खडकी आदी गावांतील अडीचशे रोहित्रे बंद केले आहेत.

कर्जत तालुक्यातील भांबोरा उपकेंद्रांतर्गत सिद्धटेक, भांबोरा, जलालपूर, गणेशवाडी, बारडगाव सुद्रिक, दुधोडी, बेर्डी या गावांमधील ७० टक्के विद्युत रोहित्रे बंद आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24