अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाची दुसर्या लाटेत अत्यंत घातक ठरलेल्या ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी गेले. ब्लॅक फंगसची नाक, डोळे व मेंदूला लागण होत असताना किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या 55 वर्षीय एका महिला रुग्णास आढळला असून, त्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन सदर रुग्णास वाचविल्याचे दिलासादायक माहिती समोर आली आहे.
ही मोठी खर्चिक शस्त्रक्रिया रुग्णांचे नातेवाईक पेलविण्यास असमर्थ असताना हॉस्पिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत फक्त औषधांचा खर्च घेण्यात आला. तर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रुग्णावर निशुल्क करण्यात आली. रुग्णाचे प्राण वाचविण्यास देवदूत ठरलेल्या डॉ. काशिद यांचा रुग्णाच्या नातेवाईकांनी सत्कार केला.
यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागत असताना, ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने हातपाय पसरायला सुरुवात केली. यात अनेकांचे बळी देखील जात आहे. म्युकर म्हणजे ब्लॅक फंगसच्या रुग्णांना नाक, डोळे व मेंदूला लागण होते. मात्र किडनीला ब्लॅक फंगसची लागण होणे अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या महिलेला आढळून आला.
सदर महिला कोरोना आजाराने चांगले होऊन घरी परतल्या. मात्र त्यांना एक महिन्यानंतर ताप, थंडीचा त्रास होऊन पाठदुखी सुरु झाली. तपासणी केल्यानंतर त्यांना उजव्या किडनीमध्ये ब्लॅक फंगस असल्याचे निदर्शनास आले. डॉ. आनंद काशिद यांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. रुग्ण पुण्याला जाऊन इतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा नगरमध्ये मॅक केअर हॉस्पिटल मध्ये भरती झाले.
सदर महिलेला कोरोनामुळे फुफ्फुसामध्ये इन्फेकशन होते. तर उजवी किडनी ब्लॅक फंगसने निकामी झाली होती. रुग्णाला मधुमेह असल्याने ही शस्त्रक्रिया करणे अधिक किचकट व गुंतागुंतीची होती. मॅक केअर हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद, मधुमेह तज्ञ डॉ. अभिजीत शिंदे, फुफ्फुस विकार तज्ञ डॉ.निलेश परजने,
भूल तज्ञ डॉ. पंकज वंजाळे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाणे यांनी सदर रुग्णावर उपचार सुरु केले. डॉ. आनंद काशिद यांनी गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करुन रुग्णाची उजवी किडनी (पुर्ण लघवीशय पिशवी पर्यंत) काढली.
किडनी मध्ये काळ्या रंगाचा पू होता. सहा दिवसानंतर रुग्ण चिंताजनक परिस्थितीतून बाहेर आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसवर वेळेत उपचार झाल्यास रुग्णांचे जीव आणि किडनी दोन्ही वाचू शकतात. किडनीला ब्लॅक फंगसची लागण होणे भारतात नव्हे, तर संपुर्ण जगात बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळले आहे.
या पेशंटचे मृत्यूचे प्रमाण देखील 70 ते 80 टक्के आहे. -डॉ. आनंद काशिद (किडनी विकार तज्ञ) कोरोना काळात अनेक ठिकाणी रुग्णांची लुटालूट होतानाचे चित्र पहावयास मिळाले. मात्र किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्यानंतर रुग्णावर उपचार करण्यास अनेक डॉक्टरांनी नकार दिला.
तर मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियेचा खर्च सांगितल्याने हा खर्च भागवणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीमध्ये डॉ. आनंद काशिद देवदूताप्रमाणे मिळाले. त्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया निशुल्क करुन कुटुंबीयांना आधार देऊन मोठ्या संकटातून वाचवल्याची भावना रुग्ण महिलेच्या मुलाने व्यक्त केली.