अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाचा थांबलेला नाही. या परिस्थितीतही काहींना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्टय़ा कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अजीर्ण झाले की ते वाईटच असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ाने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे.
‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे.
ज्याच्यापाशी 145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकडय़ांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल.
राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये.
नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला,असं शिवसेनेने म्हटले आहे.