अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यातच चक्क फिर्यादीवर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
ज्याच्या विरुद्ध फिर्याद दिली जाणार होती त्यानेच ब्लेडने वार केल्याने एकच खळबळ उडून गेली. विशेष म्हणजे ही घटना तोफखाना पोलिस ठाण्यातच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी राजू मुरलीधर काळुंखे (रा. लालटाकी) याच्या विरुद्ध भा. द.वि. क. च्या ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. साहेबराव शंकर काते (रा. लालटाकी) यांनी फिर्याद दाखल केली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी साहेबराव काते व आरोपी राजू काळुंखे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यानुसार दोघांनाही पोलिसांनी समन्स दिली होती.
त्या अनुषंगाने दोघेही तोफखाना पोलिस ठाण्यात शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आले होते.
याच दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. त्या वादातूनच फिर्यादी साहेबराव काते यांच्यावर आरोपी काळुंखे याने ब्लेडचे वार केले. फिर्यादी काते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत.