अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे. त्यादृष्टिने प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे.
संभाव्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी कोणालाही वणवण फिरण्याची वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विभागीय आयुक्त गमे आणि राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली.
आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर गमे म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन नियोजन करावे.
महानगरपालिका, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. रुग्णवाढीचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करून बाधित व्यक्तींना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे.
त्यांना इतरांपासून अलग करणे आणि संसर्गाची साखळी तुटेल या पद्धतीने आता कार्यवाही आवश्यक आहे.
यावेळी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर बेडस् रुग्णांनी अडविल्या गेल्या नाहीत ना हे तपासण्याची सूचना त्यांनी केली. उपचार आवश्यक असलेल्या व्यक्तींना ते मिळण्याची गरज आहे.