अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यातील पोलीस विभागाची प्रतिमा दिवसेंदिवस मालिन होऊ लागली आहे. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यापाठोपाठ आता महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील पोलीस विभागाचे नाव गाजू लागले आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीच गेलेल्या महिलेकडे पोलीस कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले पोलीस ठाण्यात घडला आहे.या पोलीस कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे अशा मागणीचे निवेदन तक्रारदार महिलेने अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिलाने अर्जात म्हंटले आहे की, मी विधवा असून, दीराबरोवर जमीनीचे वाद सुरु आहे. या घरगुती त्रासाबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.
तक्रारीच्या तपासकामी अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन रमेश शिंदे याने माझ्याशी ओळख वाढवून एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले आहे.
तर सातत्याने शरीर सुखाची मागणी करत आहे. सदर पोलीसाने माझी बदनामी सुरु केली असून, खोटे गुन्हे दाखल केले आहे. या पोलीस कर्मचारीमुळे माझे व मुलाचे जगणे अवघड झाले असून, मला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
आरोपी गणेश धुमाळ यांनी माझा भाऊ संदिप धुमाळ याला जबर मारहाण केली. त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना पाठिशी घालण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी जामीनावर सुटून आमच्या कुटुंबीयांना धमकावत आहे.
या प्रकरणात शिंदे पोलीस कर्मचारी आरोपींना सहकार्य करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. तसेच अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन रमेश शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप असून, सदर पोलीस कर्मचारीची चौकशी करुन त्याचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.