पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने रुग्णसेवा देखील सुरु असून, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे कॅन वाटप सुरु आहे.

लंगर सेवेच्या वतीने अहमदनगर पोलीस दलास दोनशे ऑक्सिजन कॅन देण्यात आले. गस्त घालणारे पोलीसांचे चारचाकी वाहन ही ऑक्सिजनची सेवा गरजू रुग्णांपर्यंत घेऊन जाणार आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात लंगर सेवेच्या सेवादारांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे ऑक्सिजनचे कॅन सुपुर्द केले.

यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, किशोर मुनोत, जय रंगलानी, मनोज मदान, सतीश गंभीर, राजा नारंग, करण धुप्पड, राहुल शर्मा, नारायण अरोरा, अर्जुन मदान, सुनील थोरात, सुरज तोरणे, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, प्रमोद पंतम, राजबीरसिंग संधू, संदेश रपारीया, प्रशांत मुनोत, सिमर वधवा, कैलाश नवलानी, राजवंश धुप्पड,

मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, गोविंद खुराणा आदी उपस्थित होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून जनसेवा घडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत लंगर सेवेच्या सेवादारांनी मदत पोहचवली आहे.

त्यांचे कार्य अतुलनीय असून, या ऑक्सिजनच्या सेवेद्वारे अनेक गरजूंना जीवदान मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी ऑक्सिजन पातळी घटलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॅनचा मोठा आधार मिळत आहे.

ऑक्सिजन कॅनला मागणी असून, गस्त घालणारे पोलीसांचे वाहन अनेक गरजू रुग्णांपर्यंत ही सेवा घेऊन जाणार आहे. पोलीस अधिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यान्वीत केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24