अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील एका कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या तब्बल २२ गोवंश जातीच्या जनावरांची मुक्तता केली.
या कारवाईत ४ लाख ७ हजार रुपयांचे २२ जनावरे जप्त करून त्यांची रवानगी पांजरपोळमध्ये करण्यात आली आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहर व परिसरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत.
हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरातील जमजम कॉलनी परिसरात कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना समजली .
या माहितीवरून पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरातील अब्दुल वाहिद करीम कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला.
या वाड्यामध्ये २२ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून या जनावरांची सुटका केली. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी फरार झाला.