‘या’ सहकारी संस्थेच्या 15 पैकी 14 संचालकांचे संचालक पद रद्द

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक व्यवहार असणार्‍या समशेरपूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 15 पैकी 14 संचालकांचे संचालक पद रद्द करण्यात आले.

या संचालकांकडे संस्थेची थकबाकी असल्याने सहकार खात्याने कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. सन 2017 ते सन 2021 या कालावधीतील ही थकबाकी आहे. सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी ही कारवाई केली असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान संस्थेचे संचालक संतोष बेनके यांनी केलेल्या तक्रार अर्जाची सहकार खात्याने गंभीर दखल घेऊन याबाबत सखोल चौकशी करून हा निर्णय घेतला. थकबाकीमुळे इतक्या मोठ्या संख्येने संस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन सहित 14 संचालकांचे पद रद्द होण्याची अकोले तालुक्यातील ही पहिलीच कारवाई झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.

समितीचा पुढील पाच वर्षांचा कालावधी समाप्त होईपर्यंत अपात्र सदस्य पुन्हा नियुक्तीस पात्र असणार नाहीत किंवा पुन्हा स्विकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास अपात्र असल्याचेही सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी घोषित केले.

संचालक पद रद्द झालेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे…

संस्थेचे चेअरमन सोमनाथ म्हातारबा मेंगाळ, व्हा. चेअरमन दत्तू कारभारी ढोन्नर, संचालक अशोक रामभाऊ गावंडे, संतोष रामनाथ बेणके, दत्तात्रय रामनाथ भरीतकर, चक्रधर भिमाजी सदगीर, दत्तू भागा घोडसरे, रमेश केरु बेनके, पाटीलबा आजाबा मधे, किसन धोंडीबा आगिवले,

नामदेव सखाराम बांगारे, लहानु भागा मेंगाळ, मंनाबाई सिताराम गावंडे, मंदाबाई नाथु बांगारे हे सर्व संचालक थकबाकीदार झाल्याने सर्वांचे संचालक पद रद्द झाले. लक्ष्मण कोंडाजी मेंगाळ हे एकमेव संचालक म्हणून कार्यरत राहिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office