अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
दरम्यान प्रशासनाच्या निष्क्रिय कामाचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. रस्ते वाहतूक विभागाने नगर-सोलापूर महामार्गाच्या रस्त्याचे अस्तरीकरण करण्यावर मोठा भर दिला.
परंतु, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. पावसात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. प्रवाशांना पाण्यामुळे खड्डा दिसत नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते.
कित्येक प्रवाशांचा प्रवास करत असताना मृत्यू झाला आहे. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर-सोलापूर महामार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रूईछत्तीसी येथून जातो.
त्यामुळे गावातील रस्त्याचे दर्जेदार काम करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेकवेळा आंदोलने करूनही या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता निकृष्ट झाला आहे. वेळोवेळी प्रशासनास जाग आणूनही हा प्रश्न मार्गी लागत नाही. अनेकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत.
लवकरात लवकर काम मार्गी लागले नाही तर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.