अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली आहे. यामध्ये रुग्णवाढीसह मृत्युदर देखील जास्त होतो.
मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र सध्या स्थितीला जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना पुन्हा फोफावतोय असे दिसून येत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ४८४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नगर शहरात फक्त १० जणांचा समावेश आहे. पारनेर, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिलेला आहे.
यामध्ये पारनेर मध्ये सर्वाधिक 89 , श्रीगोंदा मध्ये 61 तर शेवगाव तालुक्यात 55 रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान जिल्ह्यात गुरुवारी ६१० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. रुग्णसंख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६२२ इतकी झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले असले तरी कोरोना अजून संपलेला नाही आहे. यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.