Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुणेकर नागरिकांनीच आवाज उठवणे ही काळाची गरज ! वेताळ टेकडी फोडण्याचा प्रकल्प म्हणजे…

Pune News  : वाहतूककोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी वेताळ टेकडी तोडायची गरज नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. भविष्यात याच बरोबर पाणीटंचाईपासून वाचायचे असल्यास पुणेकर नागरिकांनीच आवाज उठवणे ही काळाची गरज आहे,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायत आयोजित वेताळ टेकडी वाचवा, पुणे वाचावा चर्चासत्रातील सूर होता. वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या समन्ववक डॉ. सुषमा दाते म्हणाल्या की, टेकडी फोडण्याची जी कारणे दिली जात आहेत त्याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येते की,

ज्यासाठी टेकडी फोडायची आहे त्यामुळे वाहनांचा फेरा विशेष कमी होणार नाही. मात्र पर्यावरणाची हानी जसं की १८०० झाडं तोडण्यात येतील असे म्हटले जात असताना प्रत्यक्षात २००० पेक्षा जास्त झाडे प्रास्ताविक प्रकल्पांतर्गत येतील. त्यावरील पशुपक्ष्यांचे जीवन नष्ट होईल.

त्यामुळे याला सर्व स्तरातून विरोध होणेच आवश्यक आहे. कन्सल्टिंग इंजिनियर प्रदीप घुमरे म्हणाले, केवळ वेताळ टेकडी परिसरावर परिणाम होणार नाही तर बाणेर-पाषाण-कोथरूड, भांबुर्डा-शिवाजीनगर-गोखलेनगर- जनवाडी, एरंडवणे या सर्व परिसरांच्या भूमिगत पाणी स्त्रोतांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन, पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डळमळीत करून कार इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री आणि बिल्डर लॉबी यांच्या फायद्यासाठी सर्व धोरणं राबवली जात आहेत. पुण्यातल्या दरवर्षी जवळपास ३ लाख वाहने रस्त्यावर येतात. एक लाख लोकसंख्येमागे केवळ १ बस असून चांगल्या चालू स्थितीतील केवळ १६०० बसेस रस्त्यावर धावतात.

जेव्हा ३००० बसची आवश्यकता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देणे, वाहन फ्री रस्ता करणे, वाहन कर लावणे यातून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे शक्य आहे.

यावेळी खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नदी सुधार समितीचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते. पुढील पाच दिवस केवळ जनजागृती वेताळ टेकडी वाचवा कृती समिती व विविध राजकीय पक्षांच्या वतीने शनिवार दि.१५ एप्रिल रोजी रॅली काढली जाणार आहे.

या रॅलीबाबतची माहिती व जनजागृती आज दि.१० एप्रिल पासून केली जाणार आहे. गोखलेनगर, जनवाडी, प्रभात रोड ब इतर भागात जनजागृती केली जाणार आहे. दत्ता बहिरट मित्र परिवाराच्या वतीने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेश मंडळांना भेटी देऊन रॅलीची माहिती सांगण्यात आली.