अकोल्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाहीच…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायतीने सुमारे दहा वर्षांपूर्वी संपूर्ण दारूबंदीचा ठराव केला होता. त्याद्वारे तत्कालीन सुरू असलेले परवानाधारक दारू दुकान ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव करून बंद केले.

मात्र त्यानंतर गावातीलच काही नागरिकांनी टाकलेल्या हॉटेलमधून छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरुवात केली. याबाबत पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लॉकडाऊन व टाळेबंदीचे कडक नियम असताना अकोले तालुक्यातील इंदोरी येथे अवैध दारू विक्री चा उच्छाद सुरू आहे.

विशेष म्हणजे पोलिसांना निवेदने देऊनही ही दारू विक्री होत आहे. पोलीस आपल्यावर कारवाईच करणार नसल्याने ह्याचा फायदा उठवत अवैध दारू विक्रेत्यांनी जोमाने दारू विकण्यास सुरुवात केली आहे.

सध्या इंदोरी परिसरात चार पाच ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असून उत्पादन शुल्क, व पोलीस यांना ही ठिकाणी माहित आहे. तरीसुद्धा ‘आम्ही नाही त्या गावचे’ अशी भूमिका घेऊन एक प्रकारे अवैध दारू विक्रीला संबंधित विभाग प्रोत्साहन देत आहे.

तालुक्यात हॉटेल जोमात सुरू आहे. खुलेआम दारूविक्री सुरु आहे. सरकारची लॉकडाऊन व टाळेबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी या हॉटेलांवर कारवाया का केल्या नाही ? अर्थपूर्ण तडजोडी आहे का ? असा सवाल नागरिक विचारू लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24