अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शनिवारी सकाळी ११ वाजता मुळा डावा कालव्याचे आवर्तन २५० क्युसेकने करण्यात आले. डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी मुळा धरणातून शुक्रवारी १०० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू झाले होते. या आवर्तनात शनिवारी सकाळी वाढ करण्यात आली.
उन्हाळी हंगामातील पाण्याचे हे आवर्तन मार्च अखेरपर्यंत चालणार आहे. यापूर्वी १५ जानेवारीला सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे पहिले आवर्तन शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याने ५ फेब्रुवारीला बंद करण्यात आले होते. शनिवारी मुळा धरणात २० हजार ७९५ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली होती.
मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय १० मार्चनंतर होण्याची शक्यता आहे. मुळा नदीपात्रातील डिग्रस बंधाऱ्यातील पाण्याची समाधानकारक स्थिती असून मानोरी व वांजुळपोई बंधारे कोरडेठाक, तर मांजरी साठवण बंधाऱ्यात निच्चांकी पाणीसाठा असल्याने बंधारे पाण्याने भरण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.