अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- यंदा चांगला पाऊस होणार या आशेने अनेकांनी खरीपाच्या विविध पीकांची पेरणी केली होती. मात्र, आता पावसाने आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर पेर वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यात ,रोहिणीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. तर सध्याही काही शेतकरी धूळवाफेवर पेरणी करत आहेत.
मात्र, आता पावसाने ऊघडीप दिल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे. येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर पेर वाया जाण्याची भीती आहे.
तालुक्यातील पठार भागावर सर्वाधिक वाटाणा पिकाची पेरणी होते, कारण वाटाणा हे पीक नगदी पैसे दणारे पीक आहे.
कमी कालवधीत अधिक पैसा देणारे पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पहात आहेत. शेतकरी पहिला पाऊस झाला, की लगेचच वाटाणा पेरणी करतात.
मात्र, यंदा पुन्हा पाऊस न झाल्याने वाटाणा पीक अडचणीत सापडले आहेत. आठ दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे बियाणे वाया जाणार आहे.