अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- मान्सूनच्या आधी आणि मान्सून संपतांना विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित, वित्तहानी होण्याच्या; तसेच विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना दरवर्षी घडतात.
वीज कडाडताच मोबाईल बंद ठेवावेत, झाडांपासून, दारे-खिडक्यांपासून दूर राहावे, टी. व्ही. बंद करावा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवावा, अशी खबरदारी पावसाळ्यात घ्यावी. त्यामुळे वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटू शकते.
जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत ४१ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगाव्ॉटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
आता ही वीज आकाशात कशी तयार होते व या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे, हे आपण बघू या. वीज कडाडत असताना तत्काळ सुरक्षितस्थळी जावे. घरात किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. दारे, खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारा, केबल, पाईपमधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो.
पाण्यात उभे असाल तर बाजूला व्हा, उंचावर असाल तर सुरक्षित जा. झाडाखाली, मोकळ्या मैदानात उभे राहू नका. स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. टी. व्ही., संगणक, फ्रीज बंद ठेवा. त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा.
मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) बंद ठेवा. लँडलाईन बंद ठेवा. त्याचा प्लग काढून ठेवा. मोबाईल चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून ठेवा. चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. एखाद्या वाहनात असेल तर त्यातच बसून राहा.
छत नसलेल्या वाहनात बसणे टाळावे, असे आवाहन शेवगावचे सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी केले.