केडगावातील लसीकरण केंद्र ठरतायत राजकीय वादाची कारणं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून गावपातळीवर लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. यातच केडगावमध्ये देखील लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मात्र आता केडगाव आरोग्य केंद्रात चालणारे लसीकरण महापालिकेच्या भाग्योदय मंगल कार्यालयात नेण्याच्या निर्णयाला केडगावमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. यावरून केडगावमधील आजी-माजी नगरसेवकांमध्ये आरोग्य केंद्रातच खडाजंगी झाली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसर केडगावमधील नागरिकांसाठी महापालिकेच्या आयुक्तांनी एकनाथनगर येथील भाग्योदय मंगल कार्यालयात व नगर-पुणे मार्गावरील निशा लॉन येथे लसीकरण केंद्रास मंजुरी दिली.

सध्या पावसाळा तोंडावर आल्याने केडगाव आरोग्य केंद्रात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या दोन्ही केंद्राना मंजुरी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिक आरोग्य केंद्रात लसीकरांनासाठी आले असता आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना भाग्योदय मंगल कार्यालय येथे जाण्यास सांगण्यात आले.

येथील लसीकरणही बंद करण्यात आले. हे समजताच शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, संग्राम कोतकर यांनी आरोग्य केंद्र गाठले. भाग्योदय कार्यालय येथून लांब असून येथील नागरिकांना ते गैरसोयीचे आहे.

त्याऐवजी अंबिकानगर येथील कार्यालय किंवा भूषणनगर येथील कार्यालयात लसीकरण सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील कोतकर यांनी केडगाव आरोग्य केंद्रातच लसीकरण सुरू ठेवावे इतर ठिकाणी ठेऊ नये, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे गणेश सातपुते, भरत गारुडकर, भूषण गुंड आदी कार्यकर्ते तेथे जमा झाले. लसीकरण केंद्रावरून त्यांच्यातच शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत राजकीय पदाधिकाऱ्यांना केंद्रातून दूर केले.

अहमदनगर लाईव्ह 24