चंद्रपूरच्या दारूचे पडसाद नगरमध्ये उमटले… तो निर्णय मागे घ्यावा, मुखमंत्र्यांना साकडं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील चंद्रपूर जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. कारण चंद्रपुरात दारूबंदी उठवण्यात आली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. यातच याच मुद्द्यावरून नगरमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

‘चंद्रपूरमध्ये अवैध दारू वाढली म्हणून ती थांबवण्याऐवजी सगळीकडे दारू सुरू करा, हे तर्कशास्त्र न समजण्यापलीकडचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाऊ लागली आहे.

चंद्रपूरमधील दारूबंदी राज्य सरकारने उठविली आहे. त्यासंबंधी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. दारूबंदी चळवळीचे राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी, वसुधा सरदार, पारोमिता गोस्वामी, अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास, महेश पवार, तृप्ती देसाई, विजय सिद्धेवार,

अड. रंजना गवांदे, डॉ्. अजित मगदुम, प्रेमलता सोनूने, अड. सुरेश माने यांच्यासह राज्यातील कार्यकर्त्यांनी हे पत्र पाठवून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे कि, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती.

महिलांच्या दीर्घ दारूबंदी आंदोलनाने हा निर्णय घेण्यात आला पण दारूबंदी उठवण्याचा निर्णयाने दारू विरोधी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिलामध्ये नैराश्य पसरले आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे कारण तेथे अवैध दारू वाढली हे देण्यात आले आहे.

असे कारण देणे हे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देणे आहे. जर अवैध दारू वाढली तर ती रोखण्याचा प्रयत्न करणे हा त्यावरचा उपाय असू शकतो.’

‘वास्तविक तिथे पकडली जात असलेली अवैध दारू ही दारूबंदी यशस्वी होते आहे, असा त्याचा अर्थ होता. पण पालकमंत्रीच दारूविक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदीला बदनाम केले गेले.

पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न करून सरकारवर दडपण आणून सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले,’ असा आरोप करण्यात आला आहे. हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील,’ असा इशाराही देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24