अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- ‘करोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही.
यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन करण्याचे संकेत दिले होते.
त्यानंतर आता खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच उपाय बोलून दाखविला आहे. मागीलवेळी कडक लॉकडाउन करण्यात आल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते.
त्यामुळे त्यांचा यासाठी विरोध सहाजिकच असला तरीही मानवतेवरील हे संकट सर्वांनी लक्षात घेऊन सरकारला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन देखील थोरात यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावला जाऊ शकतो याचे संकेत मिळाले आहे. थोरात यांनी शनिवारी सकाळी संगमनेर येथे करोना स्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनबाबत भाष्य केले. पुढे बोलताना थोरात म्हणाले,
देशासह राज्यात आलेल्या या संकटाच्या काळातही काही मंडळी राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत.
वास्तविक पहाता अशावेळी सर्वांनी एकत्र येणे गरजे आहे. विरोधी पक्षांसह जनतेच्याही सहकार्याची सरकारला गरज आहे.
जगातील उदाहरणे पाहता दुसरी लाट अधिक धोकादायक ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्याला दक्षता घ्यावीच लागेल, असं थोरात म्हणाले आहेत.