अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्प आहे.
वाळु वाहाणार्या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ हे होते.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, गणेश चे कार्यकारी संचालक अभिजीत भागडे विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे, यांचेसह संचालक मंडळातील सदस्य तसेच ऑनलाईन माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के तसेच सभासद उपस्थितीत होते.
या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेपुढे मांडून मंजुर करण्यात आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेमुळे अकोले तालुक्यातील निळवंडेच्या बंद पडलेल्या कालव्यांना चालना मिळाली. मात्र त्यांनी तळेगाव भागात एखादा कारखाना उभा राहिल म्हणुन त्यांनी मात्र विरोध केला.
असा आरोप ना. थोरात यांचे नाव न घेता करत आमदार विखे पाटील म्हणाले, निळवंडे साठी आपण साईसंस्थानचे ५०० कोटी मंजुर करवून घेतले होते. परंतु काही जण न्यायालयात गेले. निळवंडेचे पाणी गणेश परिसरात आले तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. राज्यात माफिया राज सुरु असल्याची टिका करत आमदार विखे पाटील म्हणाले,
जिल्ह्यासह राज्यात वाळू व्यवसायाने उच्छाद मांडलेला असतानासुध्दा सरकार ठोस पाऊल उचलायला तयार नाही. सरकारच या वाळू व्यवसायातील बगलबच्चांना पाठीशी घालत आहे. या वाळू व्यवसायामुळे सर्वच नदीपात्र उध्वस्त झाली असून, कोपरगाव, संगमनेरला हेच सुरु आहे. वाळु वर माफिया पोसवायचे आणि माफियांनी गावपुढारी,
गुन्हेगारी पोसवायची! हे काम सुरु असल्याची टिका आमदार विखे पाटील यांनी केली. समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आपण न्यायालयीन लढाई लढतो आहोत. या समन्यायी मुळे गोदावरी, प्रवरा, मुळा खोर्यातील पाणी कमी झाले. त्याचे शेती व्यावसायावर विपरीत परिणाम झाले. पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविले पाहिजे.
त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोर्यात पाणी निर्माण होईल. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत ५० कोटी मंजुर करुन घेतले. पण दुदैवाने आघाडी सरकार आले, या सरकारला दिड वर्ष झाले, या सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्याबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकार करु शकले नाही.
कृष्णा खोर्यातील पाणी आणण्यासाठी मात्र मोठा निधी मंजुर केला जातो, तुटीचे खोरे असलेल्या गोदावरी खोर्यासाठी का नाही? असा प्रश्न आ.विखे पाटील यांनी उपस्थित केला. आपल्या भाषणात खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ३० वर्षापासुन बंद असलेले निळवंडेचे अकोलेतील काम जेष्ठनेते पिचडांच्या सहकार्याने आमदार विखे पाटील यांनी सुरु केले. ही मोठी उपलब्धी आहे.
नगर मनमाड महामार्गाच्या कामासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ५०० कोटी रुपये आणले. साईंच्या श्रध्देमुळे हे काम १५ एप्रिलपासुन सुरु होणार आहे. शिर्डी बायपास साठी १३ कोटी रुपये आमदार विखे पाटील यांनी मंजुर करवून घेतले. त्याचेही काम सुरु होईल. दिवंगत पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे संघर्ष केले. आम्ही पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांच्यामुळेच मोठे आहोत, मंत्रीपदापेक्षा कार्यकर्त्ये महत्वाचे आहेत.
गणेश कारखाना विखे कारखान्याकडून काढून खाजगी करणाचा काहींचा बेत आहे. गेल्या ३ वर्षात राज्यातील २५ कारखाने बंद पडले. विखे पाटील घराणे जो पर्यंत राजकारणात आहे, तो पर्यंत सहकार संपणार नाही. नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण होवु देणार नाही. या तालुक्यात पक्षावर राजकारण नाही तर विखे अॅलर्जीवर राजकारण सुरु आहे. जुने कारखाने चालवितांना अनंत अडचणी असतात.
तरीही गणेश चांगला चालविला. एखादी गोष्ट तोट्याची असेल तर कोणीही उत्सुक नसतो. मात्र आम्ही कधी तसा विचार केला नाही. अधुनिकीकरण गणेश चे केले. आसवानी प्रकल्प चालु केला. या परिसरात काही आंदोलनजिवी, बुध्दीजीवी लोक आहेत, अनेकांना आम्हाला शिव्या दिल्याशिवाय झोप येत नाही.
न्यायालयात जातात, त्यांना कोण मदत करते हे सर्वांना माहिती आहे. कुणीही कितीही पत्रक काढू द्या, याचिका दाखल करु द्या आपल्याला गणेश च्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. पुढे काय ते सभासद, शेतकरी ठरवतील. राज्यात गृह विभागाचे भांडे फुटले आता महसुल विभागाचेही बदल्यांमध्ये भांडे फुटणार असल्याकडे लक्ष वेधून आता नव्याने महसुल खात्याने माती मिश्रीत वाळूच्या आणलेल्या फंड्याचा आपण लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
आपल्या प्रास्तविकात गणेश चे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ म्हणाले, विखे पाटील साखर कारखान्याने गणेश कारखाना चांगला चालविला. या परिसराला वाचविले. यावेळी ऑनलाईन माजी मंत्री व जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, बाळासाहेब जपे, विनायकराव कोते,
सुभाषराव गमे, अदि सभासदांनी चर्चेत सहभाग घेत विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, गणेश कारखाना विखे पाटील कारखान्यानेच चालवावा असा ठराव मांडला. संचालक अॅड. रघुनाथ बोठे यांचेही भाषण झाले. आभार उपाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मानले.