अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात. त्यात मतमतांतरे असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. असे काहीही नाही.
असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत.
या बैठकांदरम्यान काही ठिकाणच्या पदाधिकारी निवडीचे वादही त्यांच्यासमोर आले आहेत. नगर शहरातील असा एक वादही त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावर पटोले यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
ज्या जिल्ह्यात पदाधिकारी निवडीबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात लक्ष घालून चुकीची दुरूस्ती केली जाईल. संबंधित पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी कोणताही नेता असला तरी चूक झाली असेल तर बदल केला जाईल,
असे पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या काळात झालेले असे निर्णय पटोले बदलणार का, याकडे लक्ष लागले आहे’
महसूलमंत्री थोरात हे शनिवारी ( दि. २०) त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघात आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले.
थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा असल्याने काही जण बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले.