अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घटक ठरत आहे. मोठयांबरोबरच आता लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे.
महाराष्ट्रात मे महिन्यात तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची दैनंदिन संख्या ५० हजारांवर पोहचली होती.
त्यामुळं आरोग्य प्रशासनावर ताण आला होता. मात्र, लॉकडाऊन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळं ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र, आता आणखी एक संकटामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. १ ते २६ मे यादरम्यान ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची बाधा झाली आहे.
विशेष म्हणजे या मुलांचे वय १० वर्षांपर्यंत आहे. १ मे रोजी लागण झालेल्या एकूण बाधित मुलांची संख्या १ लाख ३८ हजार ५७६ होती.
तर, २६ मेपर्यंत तो आकडा वाढून १ लाख ७३ हजार ०६० पर्यंत पोहोचला आहे. १ मे पर्यंत राज्यात ११ ते २० वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ११ हजार ४५५ इतकी होती. व २६ मेपर्यंत याच वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ९८ हजार २६६ इतकी झाली आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतंही शास्त्रीय संशोधन व अहवाल समोर आला नाहीये. त्यामुळं पालकांनी चिंता करण्याची गरज नाहीये, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.