अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- केळी रोपांवर व्हायरस आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारातील शेतकर्यांवर केळी बागांवर तीन महिन्यांतच नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुठेवाडगाव शिवारातील केळी लागवड केलेल्या शेतकर्यांना तीन महिन्यांनंतर केळीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन वाढ खुंटली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधीत शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची दखल घेत तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केळी रोपांवर आलेल्या रोगाची पाहणी केली. या पाहणीत तज्ज्ञांनी सीएमव्ही (कुकुंबर) या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले.
हा व्हायरस कंपनी फाऊंडेशन पासूनच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसजशी केळी रोपांची वाढ होते तसतसा तो बळावतो.
कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या निष्कर्षानंतर मुठेवाडगाव येथील पाच ते सहा लागवडधारक शेतकरी हवालदिल झाले असून कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
जैन टिश्युकल्चर कंपनीने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवाजी लक्ष्मण मुठे तात्यासाहेब चौधरी, नानासाहेब आसने, लहानु मुठे, ज्ञानेश्वर मुठे आदी शेतकर्यांनी केली आहे.