एसटी बसचे रुतलेले आर्थिक चाक धावणार; राज्य सरकार एसटीला देणार 600 कोटी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  कोरोनामुळे एसटी बसचे आर्थिक चाक गेल्या अनेक दिवसांपासून रुतलेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणेही महामंडळाला कठीण होऊन बसले होते.

मात्र यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला ६०० कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात १५ एप्रिलपासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली.एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५०% आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते.

त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. याबाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, यांना करण्यात आले.

त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24