अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली असून निर्बंध वाढवायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, राज्यातली रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी केली. डेल्टा प्लस विषाणूचा धोकाही वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णसंख्याही वाढत आहे.
त्यातच निर्बंध शिथिल झाल्यामुळे बाजारपेठांमधली गर्दीही वाढत आहे. सध्याच्या सर्व परिस्थितीचा विचार करता निर्बंध शिथिल करण्याच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबतचा अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. मात्र कदाचित राज्यातील ही स्थिती लक्षात घेता पुन्हा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वडेट्टीवार म्हणाले की, जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा वेगाने फैलाव सुरू आहे.
जगात डेल्टा प्लस व्हेरियंटचे तब्बल २०५ रूग्ण झाले. यापैकी ४० रूग्ण भारतात आहेत. तर राज्यात २१ रूग्ण आढळले आहेत. जगात सर्वाधिक डेल्टाचे रूग्ण अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आढळले आहेत.
अॅस्ट्राझेनेका आणि फायझरने आपली लस डेल्टाच्या प्रत्येक व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचा दावा केला. ठाण्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षण असलेला रुग्ण सापडल्यानंतर, पुण्यातील लॅबला त्याचे नमुने पाठवले आहेत. हा रुग्ण मुळचा रायगडमधील आहे.