अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये उद्यापासून (१५ जुलै) आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत.
आवश्यक त्या खबरदारी घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत ८१ टक्के पालकांचा होकार आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास ५ लाख ६० हजार ८१९ पालकांनी सहमती दर्शवली असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती दिनकर टेमकर यांनी दिली.
शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामिण भागात शाळेत कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
शासनाच्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणाने पालन केले जाईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यात एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे,
मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असेही शासनाकडून सांगण्यात आले आहे.