शाळेचा परिसर बनतोय बेवड्यांसाठी दारू पिण्याचा अड्डा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुणतांबा स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरातच दारू पिणार्‍या दारूड्यांनी अड्डा बनविला आहे. त्यामुळे देशी-विदेशी बाटल्यांचा पसारा दररोज शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले माध्यमिक विद्यालय काही नियम अटीवर सुरू करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. या शाळेत गावातील अनेक मुले शिक्षण घेत असून येथे प्राथमिक इ. 1 ली ते 4 थी व माध्यमिकची इ. 5 वी ते 10 व उच्च माध्यमिक इ. 12 वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी गावातील व परिसरातील वाड्यावस्त्यावरील अनेक मुले येत असतात.

मात्र शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या परिसरातच दारूचा पूर येऊ लागला आहे. दररोज सकाळी शालेय परिसरात देशी-विदेशी लेबल असलेल्या रिकाम्या बाटल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. ही बाब स्थानिक पोलिसांच्या अनेक वेळा निदर्शनास अणून दिले आहे. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

शालेय परिसरात दारू पिणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच शालेय परिसरात येऊन दारू पिणार्‍या वाईट वृत्तीला आळा बसेल. यासाठी राहाता तालुका पोलीस निरीक्षक यांनी यांची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24