अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र हि तक्रार दाखल करून घेण्यास शेवगाव पोलिसांनी नकार दिला होता.
मात्र आता थेट पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चाइल्ड लाइन सदस्यांनी याप्रकरणी अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बीड जिल्ह्यातील बावी येथील तेरा वर्षीय मुलीचा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील एका वस्तीवरील तीस वर्षीय मुलासोबत विवाह पार पडला आहे.
याबाबत चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी एसपी मनोज पाटील यांची भेट घेऊन बालविवाहास बळी पडलेल्या बालिकेचा शोध घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहिती शेवगाव पोलीस ठाण्याला दिली आहे. मात्र, यंत्रणेने त्याच वेळी तातडीने शोध घेतला असता, तर हा बालविवाह रोखता आला असता, असे निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात बालविवाह प्रतिबंधक सर्व यंत्रणांना बालविवाह होत असल्याबाबत लक्ष वेधूनही संबंधित शासकीय यंत्रणेने गंभीररीत्या हा विवाह सोहळा रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळले व मुलीच्या वडिलांची फिर्याद घेण्यास नकार दिला आदी बाबींमुळे बालविवाह रोखता आला
नसल्याचा आरोप चाइल्ड लाइन या संस्थेने केला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.