एसटी संपाचा खासगी वाहन चालकांना फायदा तर प्रवाश्यांना बसतोय भुर्दंड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

राज्यभर पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला आहे. दरम्यान एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्त प्रवाशांना बसला असून तसेच बसेस नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रवाशांचा लालपरीवर विश्वास असल्याने तासंतास अनेक प्रवाशी वाट बघत होते. मात्र बसेस नसल्याने अनेकांना मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करून घरचा रस्ता धरावा लागला आहे.

एसटीच्या संपाचा फायदा उचलत खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पटीने भाडेवाढ करून प्रवाशांना आर्थिक फटका दिला आहे. एसटीचा संप केव्हा मिटतो याच प्रतीक्षेत अनेक नागरिक आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्या निमित्त शिर्डीत साई भक्तांची गर्दी वाढली असून देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत आले आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने बससेवा अनेक ठिकाणी खंडित व विस्कळीत झाली आहे.

त्याचा फटका शिर्डीत आलेल्या साईभक्त प्रवाशांना बसल्याचे दिसून येत आहेत. शिर्डी शहरात राज्यासह परराज्यांतील महामंडळाच्या सुमारे ४५० बस गाड्यांच्या फेऱ्या असतात, अगदी बसेस लावण्यावरून चालकांमध्ये हमरीतुमरी होत असते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शिर्डी बसस्थानक एसटी अभावी ओस पडल्याचे दिसत होते.

Ahmednagarlive24 Office