अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे लसीकरण ठप्प होत आहे. मात्र एक दिलासादायक माहिती समोर अली आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन जाण्याबाबत जिल्हा परिषदेला निरोप आला. त्यानुसार आरोग्य विभागाने लस आणण्यासाठी गाडी पाठविली असून २५ ते ३० हजार लसींचा डोस मंगळवारी रात्री उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
बुधवारी सकाळी या लसीचे जिल्हाभरातील लसीकरण केंद्रांसाठी वाटप होईल. त्यानंतर काही केंद्रांवर बुधवारी तर उर्वरित केंद्रांवर गुरुवारी लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून लस नसल्याने नगर जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील लसीकरण ठप्प झाले आहे.
२८ एप्रिल रोजी १९ हजार डोस प्राप्त झाले होते. ते २९ व ३० एप्रिल रोजी संपले. त्यामुळे जिल्हाभरातील लसीकरण केंद्रे गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद आहेत.
१८ ते ४४ वयोगटासाठी १० हजार लसीचे डोस १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठी केवळ महानगरपालिकेला १० हजार लसीचे डोस १ मे रोजी प्राप्त झालेले आहेत. त्यातून महानगरपालिका हद्दीतील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.