अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- शिर्डीच्या विश्वस्त मंडळांची मुदत संपल्यानंतरही नवीन नियुक्ती होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे.
त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सरकारला मुदत देऊन नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे निर्देश दिले. आता कोर्टाने यासाठी पाच जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
मात्र, मधल्या काळात यासाठी राजकीय बैठका होऊन काही निर्णयही घेण्यात आले. त्यातून विश्वस्त मंडळातील नावे ठरल्याचे सांगून ती नावे सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
मात्र अशी नावे विश्वस्त मंडळात असतील तर पुन्हा स्वच्छता अभियान राबवावे लागेल, असा इशारा शिर्डी संस्थानच्या कारभारासंबंधी याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी दिला आहे.
बारा कोटींच्या राज्यात सतरा स्वच्छ आणि पात्र चेहरे सरकारला मिळत नाहीत काय, असा सवालही काळे यांनी उपस्थित केला आहे. काळे यांनी म्हटले आहे की, ‘राज्य सरकारने साईबाबा संस्थान ताब्यात घेतले त्यासाठी स्वतंत्र कायदा केला.
विश्वस्त मंडळ व विश्वस्त कसे असावे या साठीही नियमावली तयारी केली. हाच कायदा सरकारने काटेकोरपणे पाळावा, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र, सध्या जी नावे पुढे येत आहे यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
अनेकांच्या बाबतीत मार्गदर्शक तत्वे पाळलेली दिसत नाहीत. तसेच अनेक गैरप्रकार ज्यांची नावे आहे हीच नावे अंतिम होणार असतील तर नेत्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांचेच पुनर्वसन केल्याचा प्रत्यय येत आहे.