अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे.
कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरवण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
मंत्री आठवले म्हणाले, औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे.
कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे.
देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत.
महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसीवीरसह सर्व औषधांचा पुरवठा करत आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आठवले यांनी म्हटले आहे.