अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिल्यानंतर, आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय.
हे वादळ पुढील काही तासांत तीव्र रुप धारण करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात आगामी 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असलं तरी, आगामी 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, शाहीन चक्रीवादळ सध्या 15 किमी प्रतितास वेगाने भारतीय किनारपट्टीपासून लांब जात आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातमधील द्वारकापासून पश्चिम उत्तर दिशेला 490 किमी, इराणमधील चारबहार बंदरापासून पूर्व-दक्षिणेला हे चक्रवादळ 450 किमी अंतरावर आहे.
साधारणत: १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून पाऊस आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करताे, मात्र यावेळी त्याचा मुक्काम चांगलाच लांबला. बंगालच्या उपसागरात सातत्याने निर्माण हाेणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्यानंतर ‘गुलाब’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे पावसाने परतीला १५ दिवस अधिक घेतले.
मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानेही विदर्भात पावसाचा जाेर वाढविला. काही दिवस तर पावसाने चांगलेच झाेडपले. मराठवाडा आणि काेकण परिसरात तर पावसाने कहर केला. या पावसाने शेतातील पिकांना चांगलाच फटका बसला व शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागले आहे.