राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळून मोहिमेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे.

यासाठी सर्वप्रथम राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या स्तरावरून लसीकरण संदर्भातील अ‍ॅपचे संनियंत्रण होत असल्याने त्यात नागरिकांना अडचणी येत आहेत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यावेळी थोरात म्हणाले, सध्या नगर शहर, नगर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातही रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. रुग्णांचे घरी विलगीकरण आता सक्तीने बंद करुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

अशावेळी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बहुतांशी नागरिक त्याचे पालन करताना दिसत आहेत.

मात्र, कोरोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर सर्वांनीच प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची गरज आहे. शहरी भागात सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण केले जाणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून ही वेळ मतभेदाची नाही.

जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखली आणि आपण संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24