अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- येत्या तीन दिवसांत राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.
दरम्यान केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर स्कायमेट वेदरने मान्सून केरळात दाखल झाल्याचं म्हंटलं आहे. राज्यात पावसाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली आला आहे.
त्यामुळे राज्यात एकंदरीत पावसाळा ऋतुचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार आहे. तसेच राज्यातील पुण्यासह सातारा, रत्नागिरी, ठाणे,
मुंबई, ठाणे, बीड, परभणी, हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे.