अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी नुकताच कर्जत तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागाचा दौरा केला.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर आपल्या दुःखाचा पाढा वाचून दाखविला. ‘साहेब जरा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा.
माझी आता तेला-मीठाचीही अडचण आहे. आत्महत्या केली तर मागे लहान-लहान मुलं आहेत,’ असं म्हणत एका शेतकरी महिलेनं माजी मंत्री शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
दरम्यान कुकडी प्रकल्पातून नगर व सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात कालव्याला पाणी न सुटल्याने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत.
आधीच करोनाचं संकट त्यात कुकडीचं पाणी सुटलं नाही. त्यामुळे संकटात भर पडल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं.