अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील चार कामगार कोरोनाच्या संसर्गामुळे दगावले आहेत. श्रीगोंदा कारखान्यातील २५ कामगारांना संसर्ग झाला.
मात्र संपूर्ण राज्यात एकाही ऊस तोडणी मजुराला कोरोनाची लागण झालेली नाही. यामुळे ऊसतोड मजूर कोरोनाला झुगारून आपल्या कामात मग्न असल्याचे काहीसे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या राज्यात तापमानाचा पार चढला आहे.
यातच तळपत्या उन्हात उसाच्या फडात आपल्या कुटुंबीयांसमवेत कष्ट करणाऱ्या या मजुरांनी कोरोनाला मात दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सतत झुंजणाऱ्या स्वभावामुळे एकाही मजुराला राज्यात कोरोनाची लागण झालेली नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात अनेक कारखान्यांचे धुराडे एप्रिलमध्ये ही बंद झालेले नाहीत. कोरोनाच्या ऐन तडाख्यात ऊस तोडणीचे काम सुरूच आहे. तोडणी मजुरांच्या राहोट्याही अनेक कारखान्यांच्या कार्यस्थळावर कायम आहेत.
मात्र अशा स्थितीत जिल्ह्यात एकाही तोडणी मजुराला कोरोनाची लागण झालेली नाही. सामाजिक अंतराचे नियम या मजुरांना पाळणे शक्य नाही. मास्कचा वापर करणे तर दूरच राहिले.
दिवसभर हात स्वच्छ धुण्याचा सल्लाही त्यांना देता येणार नाही. कोणताही सकस आहार मजुरांना मिळत नाही. मात्र तरीही ते कोरोनापासून बचावले हे विशेष.