अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशातील वाढत्या कोरोना संक्रमणासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी चिंता व्यक्त केली. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे.
कोरोना या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय योजना आखली याची माहिती हवी आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले आहे.
देशातील सहा वेगवेगळे उच्च न्यायालय या मुद्यांवर सुनावणी करत आहेत. यातील कोणते मुद्दे त्यांनी आपल्याजवळ ठेवावेत, याकडेही आम्ही लक्ष देऊ, असंही सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय.
ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण यासह चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली.
दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकाता, सिक्कीम आणि अलाहाबाद उच्च न्यायालयदेखील या प्रकरणांत सुनावणी करत आहे.
नागरिकांच्या हितासाठीच उच्च न्यायालय हे करत असलं तरी यामुळे गोंधळ निर्माण होत असून संसाधनांचा योग्य वापर होत नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
लॉकडाऊन लावण्याचा अधिकार राज्यांकडे असायला हवा. तसंच ऑक्सिजन पुरवठा, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची प्रक्रिया आणि पद्धत तसंच लॉकडाऊन या मुद्यावर सर्वोच्च न्यायालय विचार करेन, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले आहे.